रायगड – राज्यात आघाडीचे सरकार आहे. ते टिकले पाहिजे असे आम्हालाही वाटते.परंतु रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आणि खासदार जिल्ह्यात होणारी विकासकामे आम्हीच करीत असल्याच्या अविर्भावात आहेत. त्यामुळे शिवसेनेवर अन्याय करत आहेत. शिवसेनेच्या कामाचे श्रेय स्वतःच घेत आहेत. हा अन्याय आता सहन करणार नाही.आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर गप्प बसणार नाही.अंगावर याल तर सोडणार नाही. आमच्या नादी लागला तर जिल्ह्यात जी हालत शेकापची झाली आहे तशी तुमची करून जिल्ह्यातून हद्दपार करू, असा इशारा रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील शिवसेनेची आढवा बैठक नुकतीच अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बदलून शिवसनेचा कुठलाही मंत्री पालकमंत्री म्हणून द्या अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली. या बैठकीला आमदार महेंंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, दक्षिण-रायगड प्रमुख अनिल नवगणे, शिरीष घरत, जिल्हापरिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, तसेच इतर पदाधिकारी व नेते उपस्थित होते.