नाशिक- बहुचर्चित हनुमान जन्मस्थळाचा वादावरुन आज नाशिकमध्ये साधू-महंत, अंजनेरी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयासह राज्य आणि केंद्र सरकारकडेदेखील जाणार आहे. अंजनेरीच हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे सर्व पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करून त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नाशिकमधील साधू- संत-महंत, पालकमंत्री, खासदार, आमदार व अंजनेरी ग्रामस्थ यांची लवकरच स्वतंत्र ग्राम परिषद घेण्यात येणार आहे.
परिषदेत हनुमान यांचे जन्मस्थळ अंजनेरीच असून, भविष्यात याबाबत कुठलाही वाद होऊ नये, असा ठराव करण्यात येणार आहे. हा ठराव केंद्र आणि राज्य सरकारला पाठवला जाईल, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी हनुमान जन्मस्थळाचा वाद उगाच उकरुन काढल्याचा आरोप आज झालेल्या बैठकीत साधू-महंतांनी केला. हनुमान जन्मस्थळाबद्दल कोणीही अपशब्द, चुकीचे अर्थ आणि इतिहासाची तोडमोड करून अंजनेरीचे महत्त्व कमी करत असेल, तर आम्ही सर्व मिळून त्याला विरोध करू. त्याला मोडून काढू.असे अंजनेरी ग्रामस्थांच्या वतीने राजाराम चव्हाण यांनी सांगितले.