लखनऊ – अक्षय कुमारच्या आगामी ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर करणी सेनेने बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘पृथ्वीराज’ या हिंदू सम्राटाचे ‘चुकीचे आणि असभ्य’ चित्रण केले असल्याचा आरोप करत त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, २०१७ च्या ‘पद्मावत’च्या विरोधानंतर करणी सेनेचा हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध करण्याची दुसरी वेळ आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. चित्रपटात पृथ्वीराजची चुकीची प्रतिमा दाखवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. याचिकाकर्त्यांचे असेही म्हणणे आहे की चित्रपटाच्या प्रिव्ह्यूवरून हे दिसून येते की तो वादग्रस्त असेल. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे, की, ‘पृथ्वीराज’च्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे का? करणी सेनेच्या उपाध्यक्षा संगीता सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एआर मसूदी आणि न्यायमूर्ती एनके जोहरी यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दरम्यान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचा ‘पद्मावत’ या चित्रपटाचाही करणी सेनेने जोरदार विरोध केला होता. ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट २१ जानेवारीला रिलीज होणार होता, पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे तो होऊ शकला नाही.