मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणार
नवी दिल्ली – एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे येताच एअर इंडियामध्ये ‘विस्तारा’च्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती.मात्र आता ही प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली असून ही विलिनीकरण प्रक्रिया मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.सध्या टाटा समूहाची ‘विस्तारा’मध्ये ५१ टक्के हिस्सेदारी आहे तर उर्वरित ४९ टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे.
विस्तारा आणि एअर इंडियाचे विलिनीकरण करून या व्यवहाराचा भाग म्हणून सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये २,०५८.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सकडे असलेल्या १७.५ अब्ज सिंगापूर डॉलरच्या राखीव निधीमधून एअर इंडियाला ही रक्कम देण्याचा मानस असल्याचे सिंगापूर एअरलाइन्सने म्हटले आहे. टाटा समूहही २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये एअर इंडियाच्या वाढीसाठी निधी देणार आहे. सध्या टाटा समूहाकडे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर एशिया इंडिया आणि विस्तारा या चार हवाई सेवा कंपन्यांची मालकी आहे. चालू वर्षांत जानेवारीमध्ये टाटा समूहाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिग्रहण केले होते.