मुंबई – लिटल मास्टर सुनील गावसकर यांना बीकेसी म्हणजेच वांद्रे-कुर्ला संकुलात म्हाडाच्या मालकीचा २ हजार चौरस मीटरचा भूखंड इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच राज्याच्या गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. या भुखंडावर हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, स्क्वॅश तसेच प्रशिक्षणार्थींच्या राहण्याची व्यवस्था आणि स्पोर्ट्स कॅफेटेरिया असणार आहे.
फडणवीस सरकारच्या काळात हा भूखंड गावस्कर यांच्याकडून काढून घेण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र ठाकरे सरकारने अखेर हा भूखंड गावस्कर यांच्या पदरात टाकला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गावस्कर यांनी २७ जानेवारी २०२१ केलेल्या विनंतीनुसार त्यांना बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांनादेखील परवानगी देण्यात आली असून तसा शासन निर्णय १४ सप्टेंबरला काढण्यात आला आहे. यात पुढील ३० दिवसांत या फाऊंडेशनला म्हाडासोबत भाडेकरार पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर एक वर्षात बांधकाम सुरू करून ते तीन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या भूखंडावर क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी, खेळाडू यांना काही दुखापत झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्पोटर्स मेडिसीन सेंटर उभारण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. विविध खेळांमधील तज्ञ तसेच प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यासाठी ऑडिटोरियम उभारण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या खेळ प्रशिक्षण केंद्राला इनडोअर क्रिकेट स्टेडियमऐवजी मल्टी फॅसिलिटीज स्पोटर्स सेंटर विथ इनडोअर आणि आऊटडोअर फॅसिलिटीज हे नाव देण्यासही मान्यता देण्यात आली. या खेळ प्रशिक्षण केंद्रातून मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणित रक्कमेपैकी २५ टक्के एवढी रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार आहे. या भूखंडासंदर्भात म्हाडा वा अन्य कोणत्याही प्राधिकरणाची प्रलंबित देणी असतील ती प्रदान करून म्हाडासोबत भाडेकरारनामा करावा. त्यानंतर भूखंडाचा ताबा मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत प्रत्यक्षात बांधकामास सुरूवात करावी आणि ३ वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण करून ज्या प्रयोजनासाठी भूखंड वितरीत केला आहे त्या प्रयोजनासाठीच याचा वापर सुरू करण्यात यावा, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.