नागपूर – संरक्षण दलांमध्ये साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी सेवेची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. या योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये जोरदार निदर्शने होत असून अग्निपथ आंदोलनाची धग महाराष्ट्रात पोहोचण्याचीही शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नागपूर रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे.
बिहारमध्ये सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी रेल्वेगाड्या पेटविल्या आहेत. उत्तर भारतात या आंदोलनाचे लोण पसरले आहेत. याची गंभीर दखल घेऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या समोरील परिसर तसेच मागच्या बाजूस आणि आतील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ केली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून जवळपास ५० ते ६० पोलीस कर्मचारी व अधिकारी रेल्वे स्थानकावर बंदोबस्तात तैनात केले आहेत. वरिष्ठांच्या आदेशावरून रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढविली आहे. रात्री पेट्रोलिंग वाढविण्यात आली असल्याचे लोहमार्ग पोलीस निरीक्षक मनिषा काशिद यांनी सांगितले.