मुंबई- केंद्र सरकारने सैन्य दलात भरतीसाठी अग्निपथ या नवीन योजनेची घोषणा करताच देशात विरोधासह तरुणांनी हिंसक प्रदर्शन करत देश पेटवला आहे. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. विरोध शांत करण्यासाठी केंद्र सरकारने अग्निवीरांना अनेक सरकारी सेवांमध्ये तातडीने आरक्षणाची आणि अनेक योजनांमध्ये सवलती देण्याच्याही घोषणा केल्या असताना, आता सरकारसोबतच देशातील उद्योजकही पुढे सरसावले आहेत. अग्निपथ योजनेविषयीचे महत्व त्यांनी अधोरेखीत करत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अग्निपथ योजनेवरुन देशात रान पेटलेले असताना, या सर्व प्रकारावर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दुःख व्यक्त केले. पण एवढ्यावर न थांबता त्यांनी या प्रशिक्षित अग्निवीरांना त्यांच्या ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली असून, ट्विट करत अशा स्वयंशिस्त अंगी भिनलेल्या आणि कौशल्य प्राप्त तरुणांना त्यांच्या ग्रुपमध्ये रोजगाराची संधी उपलब्घध करुन दिली जाईल असेही त्यांनी यात स्पष्ट केले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर अग्निपथ योजनेवरुन देशात सुरु असलेल्या हिंसेवरुन दुःखी झाल्याचे म्हटले आहे. या योजनेमुळे तरुणांना स्वयंशिस्त लागेल आणि त्यांच्यात क्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्याकडे चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर कौशल्य ही असेल, या गोष्टी त्यांना रोजगार प्राप्तीसाठी महत्वाच्या ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिंद्रा समुह अशा प्रशिक्षित आणि क्षमताप्राप्त तरुणांना रोजगार देण्यासाठी तयार असून अशा अग्निवीरांचे समुहात स्वागत असल्याचे ट्विट महिंद्रा यांनी केले.