पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा एकत्र बसून गप्पा मारत असतानाचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अजित पवार यांच्यासोबत गप्पा मारतानाचा हा फोटो स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मुलाचे पुण्यात लग्न होते. या लग्न सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या लग्न सोहळ्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा गप्पा मारतानाचा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्यात अनेकदा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये असताना विधानसभेच्या इंदापूर जागेवरूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शितयुद्ध सुरू होते. आघाडी असल्यामुळे ही जागा कोणाला द्यायची यावरून दोन्ही पक्षांत कलगीतुरा रंगत होता. इंदारपूरच्या जागेवर पहिल्यापासून लढत असल्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांची असायची तर अजित पवार यांच्याकडून ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावी अशी मागणी असायची. असे असताना हे दोन नेते एकत्र बसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.