श्रीनगर- काश्मीर खोऱ्यात परप्रांतीय हिंदू मजूर आणि कामगारांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरूच आहेत. त्यात शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील जैनापोरा भागात अतिरेक्यांनी चढवलेल्या हातबाँब हल्ल्यात २ मजूर जखमी झाले. त्यानंतर सुरक्षा दलाने या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली. दुसऱ्या घटनेत अनंतनागच्या रिशिपोरा भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली. त्यात हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर निसार खांडे ठार झाला. चकमकीत लष्कराचे ३ जवान आणि एक नागरिक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी बँकेत घुसून राजस्थानचा रहिवासी असलेल्या बँक मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली होती. नंतर बिहारमधील एका कामगाराचीही गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर शुक्रवारी शोपियातील जैनापोरात हातबॉम्ब हल्ला चढवला. त्यात परप्रांतीय २ मजूर जबर जखमी झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या एका घटनेत अनंतनाग जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात शुक्रवारी रात्री चकमक झाली. त्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर ठार झाला. या चकमकीत ३ जवान आणि एक स्थानिक नागरिक असे ४ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांचे नाव निसार खांडे आहे. त्याच्याकडून एके-४७ रायफल, शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. यातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काश्मीरमध्ये परप्रांतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परिणामी अनेक परप्रांतीय हिंदू मजूर घाबरून गावाकडे पलायन करत आहेत.