भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी उद्योग समूह आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. या उद्योग समूहाने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी ट्रेडमार्क नोंदवला आहे. त्यामुळे ते लवकरच इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार आहेत.
भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गौतम अदानी यांचा अदानी उद्योग समूह विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. पोलाद, विमान वाहतूक आणि बंदर क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात हा उद्योग समूह उतरणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारे बॅटरी आणि चार्जिंग स्टेशनही ते उभारणार आहेत. हरित ऊर्जा क्षेत्रातील बडा उद्योग म्हणून अदानी उद्योग समूह ओळखला जातो.