संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

अदानी प्रकरणावरून संसदेत गदारोळ! आरबीआयनेही बँकांकडून मागवली माहिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी बुधवारी उशिरा तब्बल २० हजार कोटींचा आयपीओ रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे गुरुवारी शेअर बाजारावर पडसाद उमटले. अदानी समुहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स आजही गडगडले होते. दुसरीकडे, अदानी समूहाविरोधात हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने केलेल्या दाव्यांवरून विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, हा महाघोटाळा आहे, असा आरोप करत विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. अदानी समूहावरील आरोपांची दखल आता भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील घेतली आहे. अदानी समूहाची गुंतवणूक आणि समूहाला दिलेल्या कर्जांची माहिती आरबीआयने बँकांकडून मागवली आहे. त्यामुळे चारही बाजुंनी अदानी समूह संकटात सापडला आहे.

संसदेत आज आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अदानी प्रकरणावरून जोरदार आरोप केले. अदानी हे पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय असल्याने ते या मुद्द्यावर शांत आहेत. अमृतकाळातील हा महाघोटाळा आहे, असे घणाघाती आरोप त्यांनी केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले, सर्व पक्षांच्या नेत्यांनी मिळून एक निर्णय घेतला आहे. अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली एक समिती स्थापन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ही समिती दररोज रिपोर्ट सादर करेल. एलआयसी,एसबीआय आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गुंतवणूक करून लोकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. त्यांच्या गुंतवणुकीचे काय, असा सवाल मल्लिकार्जून खरगे यांनी केला.

अमेरिकेतील रिसर्च कंपनी हिंडनबर्गने दिलेल्या अहवालानंतर अदानी समूह चहूकडून अडचणीत सापडला आहे. या आरोपांनंतर समूहाचे आतापर्यंत १०० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. हा रिपोर्ट जारी झाल्यानंतर अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. ही घसरण सुरूच आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या