मुंबई : उद्योजक अनिल अंबानी यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. अंबानी यांच्यावर स्विस बँकेत जमा असलेल्या अघोषित पैशांचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अंबानी यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या दंडाच्या नोटिशींच्या अनुषंगाने १७ मार्चपर्यंत कुठलीही कारवाई करू नका, असे आदेश न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला दिले.
काळा पैशांसंबंधी कायदा तसेच २०१५ च्या कर कायद्यांतर्गत जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशीला अंबानी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. स्विस बँकेच्या खात्यांमध्ये जमा असलेल्या ८१४ कोटींहून अधिक किमतीच्या अघोषित निधीवरील कर चुकवल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने ९ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांना नोटीस बजावली होती. ही कारवाई मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करीत अंबानी यांनी न्यायालयात दाद मागितली होती.