मुंबई – 100 कोटी कथित वसुली प्रकरणात ईडीने अटक केल्यामुळे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी 27 जानेवारी रोजी पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर दोन्हीही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने निकाल राखीव ठेवून 9 मार्च रोजी निकाल देणार असल्याचे म्हटले आहे.
ईडीकडून करण्यात आलेल्या युक्तिवादात देशमुखांना जामीन देण्यास सक्त विरोध दर्शवला. अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रथम दर्शनीय आरोपी असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, जामीन दिल्यास या प्रकरणावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे देशमुखांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद कोर्टासमोर ईडीकडून करण्यात आला आहे. त्याचा मुलगा ऋषिकेश देशमुख, दुसरा मुलगा सलील देशमुख यांना आज न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास संदर्भात समन्स बजावला आहे.
ईडीने या दोघांना अनेक समन्स बजावून सुद्धा कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचा ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले. त्यानंतर आज सुनावणीवेळी न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स देण्यात आला आहे.