अमरावती :अमरावती जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात गोवरच्या आजाराचा शिरकाव झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोवर आजाराचा जिल्ह्यात शिरकाव झाला असल्याची बाब अमरावतीच्या आरोग्य विभागाने दडवली असल्याचा आरोप होत आहे.
याचं कारण म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यामुळे आरोग्य विभागाने आतापर्यंत गोवरचा शिरकाव झाल्याची माहिती दडवली होती असा आरोप होत आहे. आरोग्यमंत्री हे जिल्ह्यातून जाताच आरोग्य विभागाने गोवरबाबत माहिती जाहीर केली असल्याचे समोर आहे.
विशेष म्हणजे गोवरचे प्रथम लक्षण म्हणजे ताप. जर एखाद्या व्यक्तीला खूप ताप येत असेल तर समजावे की गोवरने त्याचे पहिले लक्षण दिले आहे. गोवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. तो प्रथम कोणत्याही व्यक्तीच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. औषध आणि लसीकरणाने हा आजार टाळता येतो. मात्र सध्या गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याचे निदर्शनास येत असतानाही अमरावती आरोग्य विभागाकडून हि माहिती का दडवली गेली असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात गोवरचे आठ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत २४९संशयित नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अमरावती शहरातील एका ग्रामीण भागात तर गोवर आजाराचे ७ रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे अमरावतीकरांची चिंता वाढली आहे. मुख्य बाब म्हणजे आरोग्य विभागाने ही माहिती आरोग्य मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेपर्यंत का दडवली? असा सवाल आता उपस्थित होत आहे.