वॉशिंग्टन – अमेरिकेच्या गन कल्चरबाबत एकीकडे जगभरात चिंता व्यक्त होत असताना दुसरीकडे अमेरिकेतील गोळीबाराच्या घटनांवर काही केल्या लगाम बसत नाहीये. रविवारीदेखील अमेरिका गोळीबाराने हादरली. शिकागोजवळील गॅरी परिसरात असलेल्या इंडियाना नाईट क्लबमध्ये गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, गन कल्चरमुळे आणखी किती निष्पाप बळी जाणार, असा प्रश्न अमेरिकेच्या सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पोलिसांनी इंडियाना नाईट क्लबमध्ये प्रवेश करताच त्यांना २ लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. यात ३४ वर्षीय पुरुष आणि २६ वर्षीय महिलेचा समावेश होता, त्या दोघांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा तपास तेथील पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, अलिकडच्या वर्षांत अमेरिकेत गोळीबाराच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. ९ जून रोजीदेखील मेरीलँडमध्ये गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी २४ मे रोजी टेक्सासच्या एका शाळेत गोळीबारात १९ मुले आणि दोन शिक्षक ठार झाले होते. या घटनांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अमेरिकन नागरिक आता देशाच्या बंदूक संस्कृतीविरुद्ध एकत्र आले आहेत. शस्त्रांचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.