वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या अमेरिकी नेत्या निकी हेली यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी निकी ह्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार आहेत. ट्रम्प यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान देणाऱ्या निकी या पहिल्या रिपब्लिकन नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्या जिंकल्या तर ब्रिटनपाठोपाठ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदीही भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता आहे.
निकी हेली यांचे बालपण दक्षिण कॅरोलिनामधील बामबर्ग येथे गेले. अमेरिकेला एका सकारात्मक वाटेने घेऊन जाण्यास आपण सक्षम आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी दक्षिण कॅरोलिनात दोनवेळा गव्हर्नर म्हणून कामगिरी बजावली. त्या संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणूनही कार्यरत होत्या. एका व्हिडीओव्दारे त्या म्हणाल्या, “नेतृत्वाच्या एका नव्या पिढीला पुन्हा जबाबदारीची जाणीव करुन देण्याची, आपल्या सीमा सुरक्षित करण्याची, देशाचा गौरव आणि ध्येय निश्चित व अधिक सक्षम करण्याची ही वेळ आहे.” तसेच ”स्वत:ला भारतीयांची मुलगी म्हणवून घेण्याचा मला अभिमान वाटतो.”