वॉशिंग्टन – येथील निरपराध लोकांसह लहान मुलांवर होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक घृणास्पद घटनांनंतर, अमेरिकन नागरिक आता या बंदूक संस्कृतीविरुद्ध एकत्र येऊन रस्त्यावर उतरले आहेत. हजारो अमेरिकन लोकांनी राजधानी वॉशिंग्टनसह देशातील सर्व शहरांमध्ये सरकारच्या बंदूक धोरणाविरोधात निदर्शने केली आहे. शस्त्रांचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, अलिकडच्या वर्षांत अमेरिकेत बंदुकीच्या गोळीबाराच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. नुकताच २४ मे रोजी टेक्सासच्या एका शाळेत गोळीबार झाला होता, ज्यात १९ मुले आणि दोन शिक्षक ठार झाले होते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वॉशिंग्टनसह ४५० शहरांमध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली. सरकारला हातावर हात ठेवून बसू देणार नाही, असे निदर्शने करणाऱ्या गन सेफ्टी मार्च फॉर अवर लाइव्हजच्या सदस्यांचे म्हणणे आहे. सरकार काहीच करत नसताना हे घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने कठोर पावले उचलून कायदा बदलण्याची गरज असल्याची मागणीदेखील करण्यात आली.
अमेरिकेने कित्येक वर्षांनंतरही आपली बंदूक संस्कृती संपवलेली नाही. याची दोन कारणे आहेत. एक अनेक अमेरिकन राष्ट्रपतींपासून तिथल्या राज्यांच्या राज्यपालांपर्यंत ही संस्कृती जपण्याचा सल्ला देत आहेत. दुसरी, बंदूक बनवणाऱ्या कंपन्या म्हणजेच गन लॉबी हेदेखील ही संस्कृती टिकून राहण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच १७९१ मध्ये राज्यघटनेच्या दुसऱ्या दुरुस्तीनुसार, अमेरिकन नागरिकांना शस्त्रे ठेवण्याचा आणि खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला. त्या काळी कायमस्वरूपी सुरक्षा दल नव्हते, म्हणूनच लोकांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रे ठेवण्याचा अधिकार दिला होता पण हा कायदा आजही कायम असून याचे परिणाम घृणास्पद घटनांमध्ये होत आहेत. एज्युकेशन वीकच्या अहवालानुसार, २०१८ पासून अमेरिकेत ११९ शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. २०२२ मध्ये शाळांमध्ये गोळीबाराच्या २७ घटना घडल्या असून त्यात १४० जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये गोळीबारात २५० लोकांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यापैकी १०३ लोकांचा मृत्यू झाला होता.