नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांनी तीव्र निषेध केला आहे. त्यात आता अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. अल कायदाने ६ जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्यास तयार असल्याची धमकी दिली आहे.
अल-कायदाने पत्रात म्हटले आहे की, ‘प्रेषितांच्या सन्मानाकरिता लढण्यासाठी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आम्ही आत्मघाती हल्ले करणार आहोत. काही दिवसांपूर्वी हिंदुत्त्वाच्या प्रचारकाने टीव्हीवरील चर्चेदरम्यान इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके बांधू जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल. तसेच पैगंबर मोहम्मद यांच्या गुन्हेगारांना आम्ही माफ करणार नाही’, अशी धमकी अल-कायदाने दिली आहे.
दरम्यान, नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात एफआयआर नोंदविण्यात आला होता. आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती. आता नुपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे.