नांदेड – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञात मतिमंद महिलेने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या महिलेने दगड मारून त्यांच्या घराच्या प्रवेश द्वारावरील सुरक्षा रक्षकांच्या कक्षाच्या काचा फोडल्या. त्यानंतर महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. या दगडफेकीत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
नांदेडच्या शिवाजीनगर भागात राहणारे माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरापासून ती महिला गोंधळ घालत चव्हाण यांच्या घरापर्यंत आली. त्यानंतर या महिलेने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी तिला अडविले. मात्र आपल्याला अडवल्याने तिने रागाच्याभरात अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि घराच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांच्या कक्षाच्या काचा फुटल्या. यावेळी अशोक चव्हाण किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य घरी नव्हते. दरम्यान, यावेळी शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून या महिलेचा कसून शोध सुरू आहे. तसेच दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.