संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

अष्टपैलू जडेजा आयपीएलमधून बाहेर! चेन्नईने अनफॉलो केले?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा ‘इंडियन प्रीमिअर लीग २०२२’ मधून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी रात्री सोशल मीडियावरून याबाबत अधिकृत घोषणा केली. ‘दुखापतीमुळे जडेजा उर्वरित सामने खेळू शकणार नाही’, असे म्हणत त्याला लवकर बरे वाटावे अशी इच्छा सीएसकेने व्यक्त केली. मात्र जडेजा नक्की दुखापतीमुळे बाहेर पडला की अजून काही? अशी शंका नेटकऱ्यांच्या मनात उपस्थित झाली आहे. याचे कारण असे की, चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून जडेजाला अनफॉलो करण्यात आले आहे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

आयपीएलमध्ये काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना झाला होता. या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान जडेजाला दुखापत झाली. त्याच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले होते. मात्र त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळेच तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता आणि आता पुढील सामने त्याला खेळवण्याची जोखीम चेन्नईचा संघ उचलणार नाही. त्यामुळे जडेजा आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांना मुकणार आहे. या हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईच्या नेतृत्त्वाची धुरा त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र चेन्नईने आठपैकी केवळ दोन सामने जिंकल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले होते. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक ठरली. त्याने १० सामन्यांत ११६ धावा केल्या आणि केवळ पाच बळी मिळवले. त्यानंतर आता जडेजा थेट आयपीएलमधून बाहेर पडल्याची बातमी समोर येताच चेन्नई सुपर किंग्स आणि त्याच्यात मतभेद झाल्याच्या चर्चांनी सोशल मीडिया ढवळून निघाला आहे. यापूर्वी जडेजाला चेन्नईच्या संघाने इंस्टाग्रामवर फॉलो केले होते आणि आता अनफॉलो केले आहे, असे काही जणांनी म्हटले आहे. त्यामुळे आधी कर्णधारपदावरून हटवले आणि आता इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, चेन्नई आणि जडेजामध्ये नक्की बिनसले तरी काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता चेन्नईच्या संघाने जडेजाला खरंच अनफॉलो केले का आणि त्याचे कारण काय आहे, हे संघाने सांगितल्यावरच सर्वांना कळू शकेल. दरम्यान, आता चेन्नईचे तीन सामने शिल्लक असून त्यांचे आठ गुण आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami