नवी दिल्ली – ‘असनी’ चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे नैऋत्य मौसमी वाऱ्याची वाट सुकर झाली आहे. परिणामी दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात यावेळी मान्सून ५ दिवस आधीच म्हणजे १५ मे रोजी दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरवर्षी नैऋत्य मौसमी वारे अंदमानात १८ ते २० मे दरम्यान दाखल होते. मात्र यंदा ते ५ दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ थंडावताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. ते पावसासाठी अनुकूल ठरत आहेत. मौसमी वाऱ्याची वाट त्यामुळे अधिक सुकर झाली आहे. १५ मे रोजी अंदमान व बंगालच्या उपसागरात ते दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारण १८ ते २० मे दरम्यान नैऋत्य मौसमी वारे अंदमानमध्ये दाखल होते. मात्र यावेळी ५ दिवस आधी ते दाखल होण्याची शक्यता आहे. परिणामी २० मेपासून पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. वाऱ्याचा वेग किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर आहे. या नैसर्गिक घडामोडींमुळे नैऋत्य मौसमी वाऱ्याचे आगमन अधिक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे यंदा पावसाळा ५ दिवस आधीच सुरू होण्याची शक्यता आहे. तेलंगणा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांतही पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील विदर्भात १६ मेपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहील. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात ढगाळ हवामान राहील. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथेही ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे पिकांबाबत शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. २७ मे ते २ जून या काळात तळकोकणात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे, असे पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.