नवी दिल्ली – अमेरिकेतील कंपनी सीवीसी कॅपिटल्सने अहमदाबाद फ्रेन्चायजीला विकत घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. कारण बीसीसीआयने अहमदाबाद फ्रेन्चायजीला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिली आहे. सीवीसी कंपनीला बीसीसीआयकडून लेटर ऑफ इंटंट म्हणजेच परवानगी बहाल करण्यासाठीचे पत्र मिळाले आहे.
अहमदाबाद फ्रेन्चायजी विकत घेणारी सीवीसी कंपनी ऑनलाईन सट्टा बाजारातील कंपन्यांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमांनुसार अशी कंपनी फ्रेन्चायजीची मालकी मिळवू शकत नाही. मात्र आता यासंदर्भातील वाद संपुष्टात आला असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआय फ्रेन्चायजीला आता परवानगी दिल्याचे लवकरच जाहीर करणार आहे. बीसीसीआयने सीवीसीबाबत भारताचे सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे माहिती मागितली आहे. मेहता यांनी या कंपनीबाबत सकारात्मक माहिती दिल्याचे कळते. तसेच सुप्रीम कोर्टाच्या तीन निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने सुद्धा त्यांना क्लिनचीट दिली आहे. बीसीसीआयने लखनऊ फ्रेन्चायजी आणि अहमदाबाद फ्रेन्चायजी या दोघांनाही तीन-तीन खेळाडू रिटेन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान, अहमदाबाद फ्रेन्चायजी हार्दिक पंड्या आणि श्रेयर अय्यर आणि अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाज राशिद खानला आपल्याकडे घेण्यासाठी उत्सुक आहे.