सिंधुदुर्ग – देशासह राज्यात करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता, मागील वर्षी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची भराडी देवी यात्रा आणि इतर यात्रोत्सव अगदी मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरे करण्यात आले होते. यंदा मात्र कोरोनाचे सावट दूर झाले असून, नियमही शिथिल केले आहेत. त्यामुळे कालपासून सुरू झालेल्या भराडी देवीच्या यात्रेस भाविकांनी गर्दी केली असून, यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त संख्येने भाविक येथे आले असल्याचे पहायला मिळत आहे.
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कालपासून ही यात्रा सुरु झाली असून, कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने शासनाच्या नियम व अटींचे पालन करून यात्रोत्सवाचा हा सोहळ पार पडत आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना अगदी सुलभतेने दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था केली असून, येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे आंगणेवाडीची यात्रा गाव मर्यादित संपन्न झाली होती.
यंदा मात्र मोठ्या उत्साहात भराडी देवीच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. काल पहाटे पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून भराडी मातेची ओटी भरल्यानंतर भाविकांच्या ओटी भरण्याचा व नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या यात्रेनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. याबराेबरच संपूर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.