मानागुआ – बाळाचा जन्म साधारणपणे घरी किंवा रुग्णालयात होतो. फार फार तर प्रसूतीकाळात आई प्रवासात असेल तर रस्त्यात, रेल्वेत किंवा विमानात होतो. मात्र समुद्रात बाळाचा जन्म झाल्याचं कधी ऐकलंय? म्हणजे जहाजात किंवा होडीत नाही हा, तर भर महासागराच्या कुशीत एका आईने आपल्या बाळाला जन्म दिल्याची घटना नुकतीच समोर आली. महत्त्वाचे म्हणजे या घटनेचे कारणही तितकेच खास आहे.
जोसी प्युकर्ट नावाच्या २७ वर्षीय महिलेने आपल्या बाळाच्या जन्मासाठी मुद्दाम महासागर निवडला. तिला निसर्गाच्या देणगीला नैसर्गिक पद्धतीने, नैसर्गिक वातावरणात या जगात आणायचे होते. त्यामुळे आपली समुद्रात प्रसूती व्हावी म्हणून ती जर्मनीहून मध्य अमेरिकेत आली होती. यंदा फेब्रुवारी महिन्यात तिने नायकारगुआमध्ये प्रशांत महासागरात आपल्या मुलाला जन्म दिला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले असून ते आता व्हायरल झाले आहेत. प्रसूतीच्या अनुभवांबाबत सांगताना जोसी म्हणाली, ‘प्रसूती वेदनेवेळी समुद्राच्या लाटांनी मदत केली. जेव्हा लाटा शरीरावर पडायच्या तेव्हा वेगळाच अनुभव मिळायचा. पूर्णपणे सुरक्षित वाटत होतं. मूल जन्माला येताच मऊ वाळूला स्पर्श करेल ज्यामुळे त्याला एक वेगळं समाधान मिळेल, याची कल्पना मला होती.’
दरम्यान, जोसीचं हे चौथं बाळ असून तिची पहिली प्रसूती रुग्णालयात, तर दुसरी आणि तिसरी घरीच झाली होती. तर आपल्या चौथ्या प्रसूतीत तिला दुसऱ्या कोणाचीच दखल नको होती. ही प्रसूती तिला कोणाच्याही मदतीशिवाय मोकळ्या आणि नैसर्गिक वातावरणात करायची होती. त्यामुळे तिने मुलाच्या जन्माची तारीख, वेळ, स्कॅन हे काहीच केलं नाही. ती केवळ निसर्गाच्या घंट्याची प्रतीक्षा करत होती. जशा वेदना सुरू झाल्या तसे तिने आवश्यक सामान घेतले आणि थेट प्रशांत महासागर गाठले. प्रसूतीवेळी तिच्यासोबत केवळ तिचा नवरा होता. बाळाची गर्भनाळ त्यानेच खेचून काढली. आता आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.