नवी दिल्ली: -आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारणाऱ्या पुरातत्व विभागाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आग्रा किल्ल्यावर चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी दिली जाते, मग शिवजयंतीला का नाही, असा सवाल करत दिल्ली उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला सुनावले. या प्रकरणी ८ फेब्रुवारीपर्यंत आपले म्हणणे मांडा असे निर्देश उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला दिले आहेत.
आग्रा किल्ल्यावर १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. कोणतेही कारण न देता पुरातत्त्व विभागाने ही परवानगी नाकारली. मात्र यापूर्वी आगाखान पुरस्कार आणि अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. या दोहोंचा किल्ल्याशी कोणताही ऐतिहासिक संबंधही नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या या निर्णयाविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर.आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.