मुंबई – इंधन दरवाढ आणि सर्व वस्तूंवरील वाढत्या महागाईनंतर आता मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांनी वाढ केली आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे मुंबई महापालिकेकडून पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. मात्र गेल्या वर्षी 2021 मध्ये 5.29 टक्के वाढ केली होती. त्यानंतर आता 2022-23 या वर्षासाठी मुंबई महापालिकेकडून उद्यापासून पाणीपट्टी दराच्या वाढीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज 3850 दशलक्ष लीटर शुद्ध पाणी पुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारण्यात येते. नव्या पाणीपट्टी वाढीनुसार प्रति एक हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी 4.93 रुपयांवरून 5.28 रुपये तर इमारतींची पाणीपट्टी 5.94 रुपयांवरून 6.36 रुपये होणार आहे. नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी 23.77 रुपयांवरून 25.26 रुपये तर व्यावसायिक विभागात 44.58 रुपयांवरुन 47.65 रुपये होणार आहे.