मुंबई – उन्हाळी सुट्टी संपून शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. याबाबत शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी तारीख घोषित केली आणि विद्यार्थी-पालकांची शाळेच्या तयारीची लगबग सुरू झाली. अखेर ठरल्याप्रमाणे विदर्भातील सोडून राज्याच्या इतर भागांतील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. परंतु विद्यार्थी मात्र १५ जूनपासून शाळेत उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण आयुक्तांच्या पत्रानुसार, राज्यातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु यंदा कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी शाळांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येणार आहे. म्हणजेच दिनांक १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात याव्या, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. तर, विदर्भातील शाळा मात्र २७ जूनपासून सुरू होणार आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन चौथा सोमवार, म्हणजेच २७ जून रोजी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.