रामपूर- समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यापाठोपाठ आता त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या विधानसभेची आमदारकी रद्द झाली आहे. मुरादाबाद येथील विशेष न्यायालयाने सोमवारी आझम खान आणि अब्दुल्ला आझम यांना 15 वर्षे जुन्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा सचिवालयाने अब्दुल्ला आझम यांची जागा रिक्त घोषित केली. अब्दुल्ला आझम खान रामपूरच्या सुआर मतदारसंघातून आमदार होते. मात्र, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेच्या तारखेपासून अपात्र ठरवले जाते.