बीड – मागील आठ वर्षांपासून बंद असलेला बीड तालुक्यातील राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना आता लवकरच सुरू होणार आहे. हा साखर कारखाना बँकेनेच भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गजानन सहकारी साखर कारखाना लवकर सुरू करावा अशी मागणी केली होती. ही मागणी आता पूर्ण होत आहे. २०१४ पासून हा राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना बंद आहे. यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे संबंधित नेत्यांनी म्हणावे तितके लक्ष आजपर्यंत दिले नव्हते. मात्र आता बँकेवरील कर्जाचा आकडा वाढत असल्यामुळे बँकेनेच हा कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारखान्यावर एकूण ९० कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि हा कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच कर्जातून मुक्ती व्हावी आणि साखर कारखाना परत चालू व्हावा म्हणून आता भाडेतत्वावर हा कारखाना देण्यासंदर्भात हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात बीड शहरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना संदीप क्षीरसागर यांनी गजानन सहकारी साखर कारखाना चालू करण्याची इच्छा लोकांसमोर व्यक्त केली. कारण हा साखर कारखाना उभारताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. आता बंद पडलेला कारखाना बघितल्यावर मला खूप वाईट वाटते, कारखाना चालू होता तेव्हा त्याच्यात नवीन मशिनरी जयदत्त क्षीरसागर यांना लावता आल्या नाहीत आणि त्यांनी कारखाना बंद पाडला. कारखाना चालू व्हावा ही माझ्या वडिलांची इच्छा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मी कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले होते. ही त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.