संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

आता मुंबई ते नवी मुंबई प्रवास वॉटर टॅक्सीने ३० मिनिटांत होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईकरांसाठी या नव्या वर्षात एक झक्कास गिफ्ट मिळणार आहे. बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. या टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास अत्यंत कमी वेळेत करता येईल. आतापर्यंत मुंबईहून नवी मुंबईपर्यंत केवळ रस्ते आणि रेल्वेमार्ग उपलब्ध होता, आता मुंबईकरांना जलमार्गे प्रवासाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई ते नवी मुंबईपर्यंत रस्ते मार्गाने जाण्यासाठी टॅक्सीद्वारे सव्वा तास ते पावणे दोन तास असा वेळ लागतो. मात्र नव्या वॉटर टॅक्सीद्वारे हा प्रवास आता केवळ ३० मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीवरील ताणही कमी होऊ शकेल.

या वॉटर टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबईतील दोन जेट्टीदरम्यान प्रवाशांना वाहतूक करता येईल. यात जेएनपीटी येथे एक स्टॉप असेल. दुसरी सेवा मुंबई ते रायगड जिल्ह्यातील रेवस दरम्यान असेल. मात्र या सुविधांसाठीचे भाडे काहीसे महाग आहे. जलमार्गाची ही सेवा खासगी ऑपरेटरकडे सोपवण्यात आली आहे. याचे भाडे प्रति प्रवासी, प्रति मिनिट ४५ रुपये एवढे सध्या ठरवण्यात आले आहे. म्हणजेच मुंबई ते नवी मुंबईचे भाडे १२०० ते १५०० रुपयांदरम्यान असेल. तर जेएनपीटीपर्यंतचे भाडे ७५० रुपये असू शकते. ही सेवा वर्षातून ३०० ते ३३० दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल. पावसाळ्यात सेवा बंद राहील. या सुविधेकरिता सध्या ५० आसनी, ४० आसनी,३२ आसनी आणि १४ आसनी अशी चार जहाजे आहेत.याद्वारे २५ नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकतो.

प्रवाशांना इथपर्यंत येण्यासाठी चर्चगेट, सीएसटी, नरिमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया, डीसीटी, डॉकयार्ड, बेलापूर, नेरुळ आणि जेएनपीटी अशा विविध ठिकाणी पूल कॅब असतील. या शेअर अ कॅब तत्त्वावर असतील. त्यासाठी प्रति व्यक्ती २० ते ३० रुपये भाडे आकारले जाऊ शकते. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांनी एकत्रितपणे काम केले. मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबईतील फेरी वार्फ येथे डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल उभारले तर सिडकोने नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरूळ येथील टर्मिनलचे बांधकाम केले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले जाणार होते. पण काही कारणामुळे ते करता आले नाही. मात्र नितीन गडकरी हे जहाज मंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाला चांगलाच वेग आला असून आता लवकरच त्याचे उद्घाटनही होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami