नवी दिल्ली : दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणूक १६ फेब्रुवारीला घेण्याच्या दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मान्यता दिली आहे. एमसीडी निवडणुकीनंतर चौथ्यांदा ही सभा होणार असून, त्यात महापौर, उपमहापौरांसह स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टी आणि भाजपच्या गदारोळामुळे दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक ६ जानेवारी, २४ जानेवारी आणि पुन्हा ६ फेब्रुवारीला होऊ शकली नाही. आतापर्यंत तीनवेळा महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही. या बैठकीत भाजप आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे निवडणूक होऊ शकली नाही आणि सभा तहकूब करण्यात आली. महापालिका निवडणुकीला दोन महिने उलटले असून दिल्लीला महापौरपद मिळालेले नाही.