मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती क्षणाक्षणाला कठीण होत असताना अनेक वृत्तवाहिन्यांनी असा दावा केला आहे की, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून त्यांच्या कॅबिनेट पदाचा संदर्भ काढून टाकला आहे. सुमारे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या राजकीय गोंधळात शिवसेनेचे हे मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. मात्र इंटरनेटवर पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रोफाइल संग्रहांवर नजर टाकल्यास असे दिसून आले की, त्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये कधी आपल्या कॅबिनेट पदाचा उल्लेख केलेलाच नव्हता.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या अनेक बातम्यांमध्ये असे म्हटले आहे की, मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून ‘मंत्री’ हा शब्द काढून टाकला आहे. मात्र युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांच्या बायोमध्ये हा शब्द कधीच नव्हता. तसेच शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये कधीही ‘मंत्री’ असा उल्लेख केला नाही, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आणि आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर बायोचा संबंध नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची ट्विटर प्रोफाइल २०१४ ते १३ जून २०२२ दरम्यान ३६२ वेळा संग्रहित करण्यात आली. मार्च २०२० पासून त्यांचे प्रोफाइल सारखेच असल्याचे दिसत आहे.