संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना देशभरात लोकसभा निवडणूक लढणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – देशभरात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकांसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाची घोषणा केली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लोकसभा निवडणुका लढवेल.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही नुकतेच गोव्याहून परत आलो आहोत आणि लवकरच आदित्य ठाकरेंसोबत उत्तर प्रदेशात जाणार आहोत. युपीत अखिलेश यादव सरकार स्थापन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभरात लोकसभा निवडणूक लढवू. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. गोवा , मणिपुर , पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. शिवसेना गोव्यात आणि उत्तर प्रदेशात निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनेचे अनेक नेते या राज्यांमध्ये प्रचार करताना दिसून येत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हेदेखील काल प्रचारसभेसाठी गोव्यात गेले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळेल, असं भाकित भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले होते. त्यावर बोलताना राऊत यांनी उपरोधिक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे निर्मळ मनाचे आहेत. एक चांगली व्यक्ती आहे. त्यांच्या वेदना आम्ही समजू शकतो. चंद्रकांत पाटील हे तारखांवर तारखा देत राहतील. तारखा देऊनही सरकार पडत नाही. आम्हाला पाडता पाडता ते स्वतःच पडले, असा टोला राऊत यांनी लगावला. यावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी त्यांना साक्षात्कार झाला नाही. आपल्या माजी नेत्याच्या विरोधात असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सांगणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरही प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते योग्यच आहे. कोविड काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या कामाचे जगभरातून कौतुक झाले आहे. आमच्याकडे गंगेत मृतदेह वाहून जात नव्हते. ज्यांना एफआयआर दाखल करायचा आहे, त्यांनी वाराणसीत दाखल करावा. कोविड काळात तिकडे किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत करावा. तशी मागणी करावी. कुणी भुंकत असेल तर, त्याकडे राज्यातील जनता लक्ष देत नाही.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव हे पुढे आहेत, गोव्यातही काँग्रेस सध्यातरी पुढे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस तेथे ठाण मांडून आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा. पण जमिनीवरील चित्र वेगळे आहे, मला काय म्हणायचे आहे ते समजून जातील, उत्पल पर्रिकरांना तिथे चांगला पाठिंबा मिळत आहे. ही बाब चांगली आहे, असेही राऊत म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami