मुंबई- बंडखोर आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघासह राज्यात युवासेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेचा सातवा टप्पा उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे. याची सुरूवात नाशिक जिल्ह्यातून होणार असून 7 ते 9 अशा तीन दिवस ते मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात संवाद यात्रा काढणार आहेत.
या यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला उद्या 6 फेब्रुवारीपासून इगतपुरी, मुंढेगाव येथील शिवसंवाद मेळाव्याने सुरूवात होणार आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे सिन्नर वडगाव पिंगळा येथे मेळावा घेणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी निफाड तालुक्यातील चांदोरी, विंचूर, नांदगाव येथील मेळावा आटोपल्यानंतर दुपारी ते औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करतील. दुपारी तीन वाजता वैजापूर तालुक्यातील महालगाव येथून त्यांच्या शिवसंवाद यात्रेला सुरूवात होईल. 8 फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील सोमठाणा, रामनगर, घनसावंगी येथे तर साडेचार वाजता बीड जिल्ह्यातील गेवराई येथे तर 9 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन, पाटोदा आणि खुल्ताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथे आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहेत.