मुंबई – एरवी राजकीय फटाके फोडणारे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंचे दिवाळीत एक वेगळे रूप पाहायला मिळाले. बालगोपाळांबरोबर त्यांनी चक्क मातोश्री निवासस्थानासमोर किल्ला बांधला. स्वतः चिखलात हात घालून त्यांनी हा मजबूत किल्ला बांधला. त्याला रंगरंगोटी व सजावट केली. मुलांसोबत किल्ला बनवण्यात दंग आदित्य ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याला नेटकर्यांनी दाद देत हा ‘मातोश्रीचा लय मजबूत किल्ला’ अशी प्रतिक्रिया दिली.
दिवाळीत नवे कपडे आणि फटाक्यांबरोबरच किल्ले बांधण्याची एक वेगळी मजा असते. गावापासून शहरापर्यंत दिवाळीत घरासमोर किल्ला बांधण्याची प्रथा रुजू झाली आहे. बच्चे कंपनी हे किल्ले बांधण्यात आघाडीवर असतात. ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी दिवाळीत अनेक ठिकाणी किल्ले स्पर्धा घेतल्या जातात. या किल्ल्यांमध्ये खेळण्यातील मावळे आणि शिवरायांचे सिंहासनही पाहायला मिळते. अनेक जण वेगवेगळे आकर्षक आणि भव्य-दिव्य किल्ले बांधतात.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही असाच आगळावेगळा किल्ला मातोश्रीसमोर बांधला. त्यांच्यासोबत लहान मुलेही किल्ला बांधण्यात सहभागी झाली होती. आदित्य यांनी स्वतः हा चिखलाचा किल्ला बनवला. त्याला रंगरंगोटी करून आकर्षक सजावट केली. त्यानिमित्ताने त्यांचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले. शिवसेना फुटल्यानंतर आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरेंचा हा मजबूत मातोश्री किल्ला, अशी प्रतिक्रिया नेटकर्यांनी व्यक्त केली आहे.