नवी दिल्ली- देशाला हादरवून सोडणार्या श्रध्दा वालकर हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबवर आज हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन आफताबला घेऊन जात असलेल्या पोलिसांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका पोलिसाने गाडीतून उतरत हवेत गोळीबार केल्याने हल्लेखोर दूर पळाले. यावेळी हल्लेखोरांकडील तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. हा हल्ला हिंदू सेनेने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेवरुन आता राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिसांकडून सध्या आफताबची पॉलिग्राफ टेस्ट सुरु आहे. यासाठी आज आफताबला रोहिणी परिसरातील लॅबमध्ये पॉलिग्राफ टेस्टसाठी नेण्यात आले होते. ही टेस्ट झाल्यावर पोलिसांच्या गाडीतून आफताबला पुन्हा तुरुंगाच्या दिशेने नेले जात असताना अचानक हिंदू सेनेचे कार्यकर्ते हातात तलवारी घेऊन आले. या तलवारींच्या साहाय्याने त्यांनी आफताबच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांना पांगवण्याचा प्रयत्न केला. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीचा दरवाजा उघडून आत शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लोखंडी गजांमुळे त्यांना आफताबपर्यंत पोहोचता आले नाही. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून एका पोलीस अधिकार्याने गाडीतून खाली उतरत बंदूक काढून हवेत गोळीबार केला. यानंतर दिल्ली पोलिसांनी वेगाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तलवारीही जप्त केल्या. यावेळी एका हल्लेखोरांने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, आमच्या माता-बहिणींवर अत्याचार करत आहे. मग त्याला अशाप्रकारे का मारु नये?. आम्ही बंदूक आणि तलवार घेऊन येऊ. आम्ही जेलमध्ये जाऊ, आमच्या कोणत्याही बहिणीवर अत्याचार केला तर आम्ही त्याला मारु, असेही त्याने म्हटले.