संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला; युक्रेनने रशियाला खेचलं आंतरराष्ट्रीय न्यायालयात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कीव – रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांत मोठ्याप्रमाणात विध्वंस झाला आहे. त्यामुळे युक्रेनने आता रशियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलं आहे. आपल्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली युक्रेनने रशियाविरोधात हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली. . तसेच, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाची जागा काढून घेतली पाहिजे, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

“युक्रेनने रशियाविरुद्धचा अर्ज आयसीजेकडे सादर केला आहे. आक्रमकतेने युक्रेनमध्ये नरसंहार केल्याबद्दल रशियाला जबाबदार धरले पाहिजे. तसेच आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यात याप्रकरणी सुणावणी सुरू होण्याची अपेक्षा करतो,” असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

त्याच वेळी अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. या देशांनी रशियाला आंतरराष्ट्रीय बँकिंग ऑपरेटिंग सिस्टम SWIFT मधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी अमेरिकेने युक्रेनला ३५ कोटी डॉलरची लष्करी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर जर्मनीने एक हजार रणगाडाविरोधी शस्त्रे आणि ५०० स्टिंगर क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.

दुसरीकडे रशियाने शेजारील बेलारूसमध्ये युक्रेनला चर्चेची ऑफर दिली आहे. मात्र, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही ऑफर फेटाळून लावली आहे. ज्या ठिकाणाहून त्याच्या देशावर हल्ला झाला आहे, त्या ठिकाणाहून आपण रशियाशी बोलणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami