जालना- आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना घराणेशाहीवरून अनेकदा टार्गेट केले असताना त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून जणू घराणेशाहीचे समर्थन करणारी उदाहरणे दिली जात आहेत.कारण ‘आमदारांची पोरं आमदार होणार, हा निसर्गाचा नियम आहे,” असे वक्तव्य भाजप नेत्याने जालन्यात केले आहे.
भाजपचे माजी मंत्री आणि जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी हे विधान केले आहे. लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांची भाजपच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जालन्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सत्कार सोहळ्यात बबनराव लोणीकर बोलत होते. लोणीकर म्हणाले की, आमदारांची पोरं आमदार,
खासदारांची पोरं खासदार, डॉक्टरांची मुलं डॉक्टर, वकिलांची पोरं वकील आणि पुढाऱ्यांची पोरं पुढारी हा निसर्गाचा नियम आहे.माझी इच्छा नसताना राहुल लोणीकर राजकारणात आला आणि त्याने चांगले नाम कमावले.त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.मी खूप मोठा संघर्ष केला. संघर्षामुळे मला मंत्री होता आले.जिल्ह्यात तीन मंत्री असताना अडचणी यायच्या.माझ्या विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे झाली,” असे बबनराव लोणीकर म्हणाले.
राहुल लोणीकर यांच्या सत्कार सोहळ्याला भाजपातील पहिल्या फळीतील नेते उपस्थित नसल्याचं पाहून लोणीकर यांनी स्वपक्षीय नेत्यांवर देखील टीकास्त्र सोडले. मराठवाडयातील नेते हे खेकड्यासारखे खाली ओढतात.राहुलला आशीर्वाद देण्यासाठी पहिल्या फळीतील कुणी आलं नसलं तरी दुसऱ्या फळीतील सर्व नेते हजर असल्याचा आनंद झाला असे लोणीकर म्हणाले.जे लोक रस्त्यात जास्त खड्डे खोदतील,त्या खड्ड्यातून तुला पुढे जायचे आहे असे म्हणत लोणीकर यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाव न घेता शरसंधान साधले.