उस्मानाबाद- शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे या मागणीसाठी ६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले आमदार कैलास पाटील यांनी आज उपोषण स्थगित केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कैलास पाटील यांनी उस्मानाबादमध्ये आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. ६ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. आंदोलनात शनिवारी उस्मानाबाद शहरात बंद पुकारला होता. त्याला व्यापारी आणि नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सरकार आणि प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोको, जल बैठे अशी आंदोलने केली. बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे द्यावे या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर कैलास पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले.