मुंबई – मनी लाँड्रिंग म्हणजेच आर्थिक अफरातफर प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असलेले अमित चांदोले आणि एस. शशीधरण यांना काल सोमवारी उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी टॉप्स ग्रुप सिक्युरिटी कंपनीचे प्रवर्तक चांदोले आणि माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशीधरन या दोघांना प्रत्येकी एक-एक लाखांचा अंतरिम जामिनाचा दिलासा दिला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांसाठी सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कामात आर्थिक अफरातफर केल्या प्रकरणी ईडीने टॉप्स ग्रुप सिक्युरिटी कंपनी व कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेली दोन वर्षे चांदोले आणि शशीधरण हे दोघे कोठडीत आहेत.या दोघांच्यावतीने ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण, अॅड. प्रियांका दुबे आणि अॅड. मेघा गुप्ता यांनी बाजू मांडली.त्यांनी विजय मदनलाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अन्वये असलेल्या हक्कांकडे लक्ष वेधले.त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी अर्जदारांना अंतरिम जामीन मंजूर केला.जामीन मंजूर केल्यानंतर या दोघांनाही आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करून पुढील तपासात सहकार्य करावे लागणार आहे.