मुंबई-मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा घरोघरी पोहचविणाऱ्या आशा स्वयंसेविकांना मिळणारे मानधन कामानुसार अत्यल्प आहे.तसेच त्यांना दिवाळी बोनसही मिळत नाही.या मागण्यांसाठी त्यांना दरवर्षी लढा द्यावा लागतो. त्यासाठी अनेकदा सरकारशी पत्रव्यवहार केला.पण हाती काही मिळालेले नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असणार्या साधारण ४५० आशा स्वयंसेविका आपल्या या मागण्यांसाठी मंगळवार १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मुंबई महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत,अशी माहिती महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी दिली.
यावेळी एम.ए.पाटील पुढे म्हणाले की, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आशा स्वयंसेविकांना ११ हजार रुपये बोनस आणि ठाण्यात ५ हजार रुपये बोनस दिवाळीपूर्वीच दिला गेला आहे.असाच विनाविलंब बोनस मुंबईतील आशा स्वयंसेविकांना इतर सरकारी कर्मचार्यांप्रमाणे मिळवा तसेच कामावर आधारित मोबदल्याची रक्कम दुप्पट करावी या मागणीसाठी मंगळवारी हा मोर्चा काढला जाणार आहे.खरे तर यावर्षी ७ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त संयुक्त आरोग्य अधिकारी यांनी यासंदर्भात आश्वासनांची पूर्तता लवकरच केली जाईल असे सांगितले होते.पण ते केवळ आश्वासनच राहिले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव हा मोर्चा काढावा लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले.