संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

आशिया कप! महिला भारतीय संघाचा बांगलादेशवर 59 धावांनी दणदणीत विजय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भारताने ठेवलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकात 7 बाद 100 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सामना 59 धावांनी जिंकून आशिया कपमध्ये आपली गाडी पुन्हा विजयीपथावर नेली. काल झालेल्या पाकिस्तान विरूद्धच्या पराभवातून सावरत भारताने आशिया कपमधला आपला चौथा विजय साजरा केला. याचबरोबर भारत आता गुणतालिकेत 8 गुण घेऊन अव्वल स्थानावर कायम राहिला आहे.

भारताने ठेवलेल्या 160 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशने 45 धावांची सलामी देत चांगली सुरूवात केली होती. मात्र स्नेह राणाने मुरशिदा खातुमला 21 धावांवर बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर 30 धावा करणारी सलामीवीर फरगना हक्कला दिप्ती शर्माने बाद करत 68 धावांवर बांगलादेशला दुसरा धक्का दिला. या दोन धक्क्यानतंर बांगलादेशचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागला. दरम्यान निगार सुल्तानाने 29 चेंडूत 36 धावांची खेळी करत एक बाजू लावून धरली होती. मात्र येणार्‍या इतर फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. धावगती मंदावलेल्या बांगलादेशने अखेर 20 षटकात 7 फलंदाजांच्या मोबदल्यात कसाबसा शंभरचा आकडा गाठला. भारताकडून दिप्ती शर्मा आणि शफाली वर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर स्नेह राणा आणि रेणुका सिंहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार्‍या स्मृती मानधनाने बांगलादेशविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृतीने दमदार सलामी देत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी 12 षटकात 96 धावांची सलामी दिली. दरम्यान, अर्धशतकाजवळ पोहचलेली स्मृती मानधना 47 धावांवर धावबाद झाली आणि ही सलामी जोडी फुटली. यानंतर शेफाली वर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र ती 55 धावा करून रुमाना अहमदची शिकार झाली. याच रुमानाने 17 व्या षटकात रिचा घोष (4) आणि किरण नवगिरे(0) यांना पाठोपाठ बाद करत भारताची अवस्था 4 बाद 125 धावा अशी केली. दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी भारताला दडशतकी मजल मारून दिली. दिप्ती 5 चेंडूत 10 धावा करत बाद झाली. दिप्ती बाद झाल्यानंतर जेमिमाहने भारताला 20 षटकात 159 धावांपर्यंत मजल मारून दिले. तिने 24 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रुमाना अहमदने 3 षटकात 27 धावा देत 3 बळी टिपले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या