पुणे – केंद्र सरकार जीएसटीचा परतावा वेळेवर देत नाही, असा वेळोवेळी आरोप करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांनाच लोक संधी देतात, अशा शब्दात अजित पवार यांनी मोदींची तारीफ केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यात बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा पंतप्रधान मोदी सत्ते आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली आणि जे लोक विकासकामांबद्दल बोलतात त्यांनाच लोक संधी देतात. वादामध्ये रस असलेले फार थोडे लोक असतात. मात्र मोदींना वादापेक्षा विकासकामात अधिक रस असल्याने लोक त्यांच्या मागे आहेत. ते ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. यावेळी त्यांचा मान सन्मान राखायला हवा. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात. हा त्यांचा अधिकार आहे आणि पालकमंत्री म्हणून मी त्यांच्या पुण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता तपास यंत्रणांच्या कारवायांवरून राष्ट्रवादीने मोदींच्या दौऱ्याला जो विरोध केला होता तो आता मावळला आहे. मात्र अजित पवार यांनी अचानक मोदींच्या बाबत जी लवचिकता दाखवली आहे त्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.
अधिक वाचा
महाविकास आघाडीतील नेत्यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई पोलीस दलात नव्याने खांदेपालट; संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती
‘जिथे आहात तिथेच रहा’, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सूचना