गुवाहाटी – आसाम-मेघालय सीमेवर मंगळवारी घडलेल्या हिंसक घटनेनंतर आता तेथील तणाव काहीसा कमी झाला आहे. मात्र त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आसामने मेघालयचा इंधन पुरवठा थांबवला आहे. इंधन घेऊन जाणाऱ्या टँकरला पुरेशी सुरक्षा व्यवस्था केल्याशिवाय इंधनाचे टँकर मेघालयमध्ये पाठवू नयेत, असा आदेश राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा संचालक प्रवीण बक्षी यांनी ७ जिल्ह्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
आसाम आणि मेघालयच्या सीमेवर मंगळवारी सकाळी हिंसक घटना घडली. त्यात वनरक्षकासह ६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमांवर तणाव निर्माण झाला. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील वाहतूक आणि इतर व्यवहार बंद होते. आता काही जीवनावश्यक वस्तूंच्या मालगाड्यांना सशर्त परवानगी दिली आहे. मात्र इंधनाच्या टँकरला अजून परवानगी मिळालेली नाही. इंधनाचा टँकर गुरुवारी मेघालयमध्ये अडवला होता. त्यामुळे इंधनाच्या टँकरच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना जोपर्यंत चांगली सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत आसामने मेघालयमध्ये इंधनाचे टँकर पाठवण्याचे बंद केले आहे. परिणामी मेघालयचा इंधनपुरवठा विस्कळीत झाला आहे. पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. बीपीसीएल आणि एचपीसीएलसह अन्य पेट्रोल, डिझेल आणि वायूच्या टँकरना जोपर्यंत पोलिस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांची वाहतूक थांबवण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा संचालक प्रवीण बक्षी यांनी तसा आदेश ७ जिल्ह्यांना दिला आहे.