दिसपूर – आसाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराची तीव्रता अद्याप कायम असून गेल्या २४ तासांत तिथे पुरामुळे आणखी ९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आसाममधील पुरातील मृतांचा आकडा ७१ वर पोहोचला आहे. सुमारे ५,१३७ गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत.
आसाममधील ३३ बाधित जिल्ह्यांपैकी बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोंगाईगाव, कछार, चिरांग, दरांग, धेमाजी, धुबरी, डिब्रुगढ, दिमा-हसाओ, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, होजई, जोरहाट, कामरूप (एम), कार्बी, पश्चिम, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया आणि उदलगुरीला मोठा पुराचा फटका बसला आहे.
मध्य आसाममधील नागांव जिल्ह्यातील कामपूर भागात रविवारी रात्री उशिरा दोन पोलीस, एक हवालदार आणि एक अधिकारी पुराच्या पाण्यात वाहून गेले. कॉन्स्टेबलचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून बेपत्ता पोलीस अधिकार्याचा शोध सुरू आहे. रविवारी संध्याकाळी राज्यातील पूरग्रस्तांची संख्या ४२ लाखांवर गेली. रविवारी मरण पावलेल्या ९ लोकांपैकी ३ मृत्यू कछार जिल्ह्यात, दोन बारपेटा आणि त्यानंतर बजली, कामरूप, करीमगंज, उदलगुरी जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला.