जोधपूर- पोलिसांनी पीडितेला शिकवले होते. त्यानुसार ती न्यायालयात जबानी देत आहे, असा आरोप करणारी याचिका स्वयंघोषित संत आसाराम बापूने राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी आयपीएस अधिकार्याला समन्स बजावून संबंधित प्रकरणाचे पुरावे सादर करण्याचा आदेश दिला आहे. 2013 साली जोधपूरच्या आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवून 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जयपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय पाल लांबा यांनी तयार केलेला रेकॉर्डिंग व्हिडिओ सादर केला होता. हा व्हिडीओ आसाराम बापूच्या खासगी झोपडी परिसरातील आहे. या व्हिडिओमुळे पीडित महिला प्रभावित झाली असावी, अशा आरोपाची याचिका आसाराम बापू यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावरून हायकोर्टाने अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय पाल लांबा यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात त्यांनी 7 मार्चला न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदवावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलीस अधिकार्यांनी शिकवल्यानुसार पीडितेने आपल्याविरुद्ध साक्ष दिली, असाही आरोप त्यांनी केला आहे.