संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

इंडियन एयरफोर्सचा नवा गणवेष! पुढील वर्षी महिला अग्नीवीर भरती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदिगड- भारतीय वायुसेनेने ९० व्या स्थापना दिनानिमित्त आज चंदीगडच्या आकाशात शक्ती प्रदर्शन केले. त्यात भाग घेतलेल्या लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरने चित्तथरारक कवायती केल्या. त्यांच्या गर्जना पाकिस्तान व चीनलाही ऐकू गेल्या. चंदीगडमध्ये पहिल्यांदाच साजरा झालेल्या वायुसेना दिनात एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी हवाई दलाच्या नवीन गणवेशाचे अनावरण केले. हवाई दलात पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांची भरती करण्याची योजना आहे, असे त्यांनी सांगितले. हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टम विंगच्या निर्मितीला सरकारने मान्यता दिली आहे. स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारे पहिल्यांदाच ऑपरेशनल विंग तयार होत आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त चंदीगडमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त सकाळी हवाई तळावर परेडचे आयोजन केले होते. एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी परेडची सलामी स्वीकारली. त्यानंतर जवानांना मार्गदर्शन करताना त्यांनी हवाई दलाच्या नवीन लढाऊ गणवेशाचे अनावरण केले. पुढील वर्षापासून महिला अग्नीवीरांचाही हवाई दलात समावेश करण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले. हवाई दलाच्या पायाभूत सुविधाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. अग्नीवीर योजनेद्वारे हवाई दलात हवाई योद्धे समाविष्ट करणे हे आपल्या सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारतातील तरुणांच्या क्षमतेचा उपयोग देश सेवेसाठी वापरण्याची संधी आपणास मिळाली आहे. शत्रूपासून देशाला वाचवण्यासाठी भारतीय वायुसेनेने अनेक सुवर्ण लढाया लढल्या. जमिनीवरील भारतीय लष्कराच्या शौर्याबरोबरच वायुदलाचा वेग आणि शत्रूंना नेसतानाबूत करण्याचे शौर्य अतुलनीय आहे. १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धात हवाई दलाने अतुलनीय कामगिरी बजावली. केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेवर वचनपद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. पुढील वर्षापर्यंत महिला अग्नीवीरांनाही हवाई दलात सामावून घेतले जाईल. येत्या डिसेंबर पर्यंत ३ हजार अग्नीवीरांना प्रारंभिक प्रशिक्षणासाठी वायुदलात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टम शाखेची निर्मिती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. स्वातंत्र्यानंतर हवाई दलात अशाप्रकारे पहिलीच शाखा निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकामापासून उड्डाण प्रशिक्षणापर्यंतच्या खर्चात किमान ३,४०० कोटींची बचत होईल, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami