इचलकरंजी – कोल्हापूरच्या इचलकरंजीतील शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळांच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणानिमित्त शतकोत्तर परंपरा असलेल्या ऐतिहासिक लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे 11 आणि 12 जून रोजी डीकेटीई नारायण मळा येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली. इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांनी सुरू केलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती कोरोनाचा काळ वगळता अखंडीतपणे सुरू आहेत. इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळांच्या वतीने दरवर्षी या शर्यती घेतल्या जात आहेत. यंदाही कर्नाटक बेंदूरनिमित्त लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. लहान गट व मोठा गट अशा दोन गटांत ही शर्यत होत आहे. तसेच सुट्टा बिनदाती बैल पळविण्याची स्पर्धा होणार आहे. घोरपडे नाट्यगृह चौक येथे 14 जून रोजी भव्य जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 15 जून रोजी दुपारी 4 वाजता शाहीर संजय जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.