नवी दिल्ली- मागील काही महिन्यांपासून जगभरात मंदीच्या नावाखाली अनेक बड्या कंपन्या आपल्या कर्मचार्यांना कामावरून काढताना दिसत आहेत. त्यातच आता भारतातील नामांकित आयटी कंपनी इन्फोसिसने कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली आणि यानंतर एकाचवेळी ६०० जणांना कामावरून काढले.
कंपनीने कर्मचाऱ्यांची फ्रेशर असेसमेंट चाचणी घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कंपनीने ही कारवाई केली आहे. यामुळे कर्माचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .एक फ्रेशर कर्मचारी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीत रुजू झाला होता. त्याला सॅप एबीएपी प्रवाहाचे प्रशिक्षण देण्यात आले. १५० जणांच्या टीममधून केवळ ६० जण परीक्षा उत्तीर्ण झाले. बाकी सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले असे या फ्रेशरने सांगितले. आठवड्याभरापूर्वीच परीक्षा पास न करु शकणाऱ्या २०८ फ्रेशर्स कर्मचाऱ्यांना कंपनीने घरचा रस्ता दाखवला. यानंतर कंपनीने एकाचवेळी ६०० नवीन कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे.
दरम्यान, सध्या जगभरात सर्वच कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली जात आहे. टेक, स्टार्टअप आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा सर्वाधिक धोका आहे. कारण याच क्षेत्रात अनेक कर्माऱ्यांच्या नोकरीवर गदा येत आहे.
टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या देशातील बड्या आयटी कंपन्यांमध्ये केवळ अट्रिशन रेटच कमी झाला नाही, तर कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी प्रमोशन आणि इतर नवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत.