अमरावती- अमरावतीमधील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याकांडातील फरार आरोपी शेख इरफान शेख रहिम (32) याला अमरावती पोलिसांनी काल शनिवारी नागपुरातून अटक केली. त्याला आज रविवारी न्यायालायात हजर केले असता गुरुवार 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजपच्या वादग्रस्त प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांनी समर्थन केले होते. नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर उमेश कोल्हे यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यानंतर 21 जून रोजी दुचाकीने आलेल्या आरोपींनी चाकूने भोसकून कोल्हे यांची हत्या केली होती. या घटनेने अमरावतीत एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर या प्रकरणात 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र यातील मुख्य सुत्रधार इरफान शेख हा फरार होता. काल रात्री पोलिसांनी त्याच्या नागपूरातून मुसक्या आवळल्या. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एनआयकडे वर्ग करण्यात आला आहे. याचा तपास करण्यासाठी एनआयएच्या चार ते पाच अधिकार्यांचे पथक शुक्रवारी रात्रीच अमरावतीत दाखल झाले होते.